चला सुरुवात तर झाली प्रवासाला
माझ्या आयुष्यातील प्रवासाची सुरुवात कोणत्याही नियोजनाशिवाय झाली, आणि याला 'भक्तीमार्गातून झालेली सुरुवात' म्हणणे अधिक योग्य ठरेल. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना मी इस्कॉन (ISKCON) चळवळीशी जोडला गेलो. तिथे माझी भेट कार्तिक प्रभू नावाच्या एका तरुणाशी झाली, जे मूळचे कर्नाटकचे असून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर भक्तीमार्गाकडे वळले होते. वयाने केवळ २० वर्षांचे असूनही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि निर्धास्तपणा होता. जेव्हा मी त्यांना विचारले की, इतके चांगले करिअर सोडून तुम्ही हे आयुष्य का वाया घालवताय? तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर माझ्या डोक्यावरून गेले, पण मनाला स्पर्श करून गेले. ते म्हणाले होते, "कृष्ण सर्व पाहून घेतील, मला काळजी करण्याची गरज नाही." त्यांच्या या निस्वार्थी व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर प्रभाव पडला आणि मी नियमित मंदिरात जाऊ लागलो.
मायापुर येथील इस्कॉन चे वर्ल्ड हेडक्वार्टर
एके दिवशी अचानक कार्तिक प्रभूंचा फोन आला आणि त्यांनी मला थेट विचारले, "मायापूरला येणार का?" मायापूर हे पश्चिम बंगालमधील इस्कॉनचे जागतिक केंद्र आहे. फिरायला मिळेल या आनंदाने मी 'हो' तर म्हटले, पण आर्थिक अडचणीमुळे साशंक होतो. प्रभूजींनी मात्र मला आश्वस्त केले की पैशांची काळजी कृष्ण बघतील. लवकरच प्रवासाचा दिवस उजाडला. कपाळावर टिळा, हातात जपमाळ आणि साधे कपडे हीच आमची ओळख होती. आमचा पहिला थांबा होता ओडिशामधील जगन्नाथ पुरी. रथयात्रेच्या काळात तिथे असणारे चैतन्य, पहाटेची मंगलमय आरती आणि विशेषतः तिथली सात्विक भोजन व्यवस्था पाहून मी थक्क झालो. तिथला महाप्रसाद म्हणजे खरोखरच आत्मा तृप्त करणारा अनुभव होता. जरी मी एका मांसाहार चालणाऱ्या घरातून आलो होतो आणि विचारांनी नास्तिक होतो, तरीही तिथल्या भक्तीमय वातावरणाशी मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
पुरीनंतर आम्ही कोणार्कच्या सूर्यमंदिराला भेट दिली. हे मंदिर म्हणजे भारतीय शिल्पकलेचा एक अद्भूत नमुना आहे. १३ व्या शतकात राजा नरसिंहदेव यांनी बांधलेले हे मंदिर एका अवाढव्य रथाच्या आकारात असून त्याला २४ चाके आणि ७ घोडे आहेत. या मंदिराची भव्यता आणि त्यावरील कोरीव काम पाहून थक्क व्हायला होते. त्यानंतर आम्ही पश्चिम बंगालमधील मायापूरला पोहोचलो. इस्कॉनचे मुख्य केंद्र असल्यामुळे तिथला परिसर अतिशय प्रशस्त आणि वैभवशाली होता. पण तिथे गेल्यावर माझ्या मनाची तगमग सुरू झाली. एकीकडे सतत चालणारा "हरे कृष्ण" मंत्राचा जप आणि दुसरीकडे घर-कॉलेजची लागलेली हुरहूर, यामुळे मी व्याकुळ झालो होतो. खिशात पैसे नव्हते आणि कोणालाही न सांगता इतक्या लांब आल्यामुळे एक प्रकारची भीती मनात घर करून बसली होती. शेवटी तिथून बाहेर पडण्यासाठी मी एक खोटे कारण सांगितले की माझी आई आजारी आहे.
मंदिर परिसरातील सुंदर देखावा
परतीचा प्रवास अत्यंत कठीण होता. तिकीटासाठी पैसे नसल्यामुळे मी हावडा स्टेशनवरून विनातिकीट जनरल डब्यात चढलो. ३६ तासांचा तो प्रवास, अंगाला धक्के देणारी गर्दी, लोकांचा आरडाओरडा आणि गुटख्याचा तो उग्र वास... या सगळ्यात मी पूर्णपणे गांगरून गेलो होतो. न झोपता, पोटात अन्न नसताना केवळ बॅग घट्ट धरून मी दरवाज्यापाशी बसून राहिलो. पुण्यात पोहोचल्यावर मात्र मला खऱ्या अर्थाने शांत वाटले. या प्रवासाने मला खूप काही शिकवले. जरी मी इस्कॉनच्या त्या कडक भक्तीमार्गात स्वतःला बसवू शकलो नाही, तरीही कृष्णाचे तत्वज्ञान समजून घेण्याची ओढ निर्माण झाली. त्या १८ वर्षांच्या अजाण वयात मिळालेला हा अनुभव माझ्या आयुष्याला दिशा देणारा ठरला.
तुम्हा वाचकांच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवा , काही सुधारणा आवश्यक आहे अथवा तुम्हाला काही विशेष हवं असल्यास नक्की कळवा.
सम्राट पवार - मो. ९८०३०८१९४७
मेल आयडी - samrat.researchscholar@gmail.com
